Ad will apear here
Next
‘महाभारत हे केवळ धर्मयुद्ध नव्हते’ : डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांची विशेष मुलाखत
डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे...आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेले पुण्यातील ज्येष्ठ प्राच्यविद्यापंडित डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे १९ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. (जन्मतारीख : १४ फेब्रुवारी १९१८) संस्कृत भाषा, ऋग्वेद, महाभारत, निरुक्ता, तसेच पाली, प्राकृत भाषेतील संशोधन आणि अवेस्ता या पारशी ग्रंथाचे संशोधन अशा विविध विषयांत डॉ. मेहेंदळे यांनी मूलभूत अभ्यास आणि संशोधन केले. वयाच्या शंभरीतही त्यांचा बोलण्यातला उत्साह आणि नवे समजावून घेण्याची जिद्द तरुणांनाही लाजवणारी होती. साहित्य अकादमीतर्फे अभिजात आणि मध्ययुगीन साहित्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा भाषा सन्मान डॉ. मेहेंदळे यांना शंभरीत पदार्पण करताना मिळाला होता. त्या वेळी ‘बाइट्स ऑफ इंडिया’तर्फे विवेक सबनीस यांनी डॉ. मेहेंदळे यांची विशेष मुलाखत घेतली होती. ती मुलाखत आज पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. डॉ. मेहेंदळे यांना आदरांजली...
............
- सर, साहित्य अकादमीने तुमच्या मौलिक कार्याची दखल घेऊन तुम्हाला जाहीर केलेल्या या जीवनगौरव पुरस्काराबद्दल अभिनंदन! तुम्ही पुणेकर असल्याचाही आम्हाला अभिमान वाटतो!
- धन्यवाद! पुण्याशी माझा संबंध १९५०च्या दशकापासून आहे. डेक्कन कॉलेज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराशी माझा अनुक्रमे नोकरी व महाभारताच्या ‘क्रिटिकल व्हॉल्यूम्स’च्या दोन खंडांच्या कामानिमित्त झालेले संशोधन यांच्यासाठी संबंध आल्यामुळे पुणे हे माझे घर आहे. साहित्य अकादमीचा हा पुरस्कार खूप मोठा आहे. त्यामुळे त्याचा आनंद व समाधानही मोठे आहे!

- संस्कृतसारख्या भाषेचा अभ्यास करताना तुम्ही महाभारतातील काही प्रसंगांचे विश्लेषण नव्याने केले आहे. त्यावर तुम्ही खूप विपुल लिहिलेही आहे. विशेषत: महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाबाबत तुमचे मत खूप वेगळे असल्याचे सांगितले जाते. त्याबद्दल काय सांगाल?
- महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाबाबत काही गैरसमजुती झाल्या आहेत. त्यातली द्रौपदी वस्त्रहरण ही अगदी अयोग्य कल्पना आहे. कारण द्यूतात पांडव हरले, तरी द्रौपदी हरली की नाही हा प्रश्न होता. जो स्वत:ला हरवून बसला आहे, त्याला द्रौपदीला पणाला लावायचा अधिकार होता का, असा मार्मिक सवाल खुद्द द्रौपदीने निर्माण केला होता! प्रत्यक्षात पांडव व द्रौपदी यांची वस्त्रे घेऊन ये असा आदेश कर्णाने दु:शासनाला दिला. आता वस्त्र म्हणजे अंगावरचे सर्व कपडे उतरवून ठेवायचे नव्हते. दास झालेल्या माणसाला अंगावरचे उत्तरीय किवा पांघरायचे उपरण्यासारखे वस्त्र घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी ‘वस्त्रनिहार’ या शब्दाचा योग्य अर्थ लावून आपापली उत्तरीय वस्त्रे काढून ठेवली. तोच अर्थ द्रौपदीच्या बाबतीतही घ्यायला नको का? कर्ण झाला तरी तो ‘द्रौपदीच्या अंगावरील वस्त्रे काढा’ अशी आज्ञा कशी देईल? हा तो असा गैरसमज आहे. म्हणून ते द्रौपदी वस्त्रहरण नसून वस्त्र काढून घेण्याचा प्रयत्न झाला, असा त्याचा अर्थ आहे.

- सर, प्रत्येक विषयाचा भाषिक अंगाने अभ्यास करण्यामागचा तुमचा मुख्य हेतू काय आहे?
- संस्कृतसारख्या भाषा या मध्ययुगात निर्माण झालेल्या ग्रीक, लॅटिन, इंग्रजीप्रमाणे इंडो-युरोपीयन भाषिक कुळातील आहेत. संस्कृतपासून पुढे पाली, अर्धमागधी आणि प्राकृत या उपभाषा निर्माण झाल्या आहेत. त्या त्या भाषेला एक स्वत:चा संदर्भ असतो. पाली, अर्धमागधी या भाषाही संस्कृतोद्भव आहेत. जसा काळ जातो तशी भाषांची निर्मिती व त्याचे संदर्भ बदलतात. पाली भाषा ही बौद्ध धर्मासाठी निर्माण झाली, तर अर्धमागधी ही जैन धर्मासाठी. म्हणजे त्या त्या भाषेत तो तो शब्द जातो, तेव्हा त्याचे एक वेगळे महत्त्व निर्माण होते. दुर्दैवाने या गोष्टीचा आता फार कुणी अभ्यासही करत नाही. जुन्या भाषेचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा हे नव्या पिढीने समजावून घेतले पाहिजे. 

- तुमचा संस्कृतशी संबंध शालेय शिक्षणापासूनच आला होता का?
- माझा जन्म मध्यप्रदेशातील हरसूद गावी झाला, तर काही शालेय शिक्षण गुजरातमध्ये बडोद्याजवळील वाकड येथे झाले. पदव्युत्तर शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले, तर पीएचडी पुण्यात डेक्कन कॉलेजात करता आली. माझे सहावीपर्यंतचे शिक्षण गुजराती माध्यमातून झाले. तेव्हा शाळेत दुसरी भाषा संस्कृत होती; पण पुढे मात्र संस्कृतबद्दलची गोडी वाढत गेली. बीए आणि एमए झाल्यानंतर संशोधनाच्या कामामुळे संस्कृतचा अधिक जवळून परिचय झाला.

- प्राकृतशी तुमचा संबंध पीएचडीच्या प्रबंधामुळे, तसेच अन्य कारणांनीही आला. त्यामुळेच तुम्ही पुढे काही काळ जर्मनीतही होतात, हे खरे आहे का?

-‘हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत’ या विषयात मी पीएचडी मिळवली. तसेच उत्कृष्ट निबंधासाठीचे मुंबई विद्यापीठाचे प्रतिष्ठेचे भगवानलाल इंदोजी सुवर्णपदकही मला मिळाले. १९४५मध्ये अशोक इन्स्क्रिप्शन इन इंडिया या विषयावरील भाषिक अंगाने अभ्यास किंवा लिंग्विस्टिक स्टडी व त्याची सूची करण्याचे काम मी केले. माझे प्राकृत भाषेशी संबंधित असलेले हे सर्व काम जर्मनीपर्यंत पोहोचले असावे. तुम्ही म्हणता तसेच प्राकृतमुळेच मी दोन वर्षे जर्मनीत वास्तव्यही केले!

- जर्मनीत तुमचे कशावर काम चालले होते?
- घडले असे, की तेथील गॉटिंगगेन विद्यापीठात प्राकृत भाषेसंबंधीच्या संपादनाचे काम चालू होते. या कामात माझा उपयोग होईल असे त्या लोकांना वाटले. भारतीय विद्या किंवा इंडॉलॉजीचे तेथील अभ्यासक हेन्री ल्यूडर्स यांच्या ऋग्वेदाच्या संदर्भातील अप्रसिद्ध कामातील प्राकृत भाषेतील संपादनाचे काम तेथील प्रा. वॉल्टश्मिट यांच्याकडे आले. त्यांनीच या कामासाठी मला आवर्जून बोलावून घेतले. विशेषत: प्राकृतच्या निमित्ताने त्यांनी संस्कृतमध्ये जे संशोधन केले, ते जर्मनीतून वाचता यावे यासाठी त्यांना माझी मदत झाली. ल्यूडर्स यांनी त्यांची अभ्यासाची लपवून ठेवलेली कागदपत्रे दुसऱ्या महायुद्धात अस्ताव्यस्त झाली. ती एकत्र करताना या अभ्यासाची गरज होती. यामुळे मलाही तिथे जर्मन भाषा शिकता आली! या विद्यापीठात माझी ‘आधुनिक भारतीय भाषांचे शिक्षक’ म्हणून नेमणूकही झाली होती. याच सुमारास मी डेक्कन कॉलेजात नोकरीस होतो; पण जर्मनीस जाण्याची परवानगी कॉलेच्या व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या पाठिंब्यामुळे मिळाली!

- जर्मन आणि संस्कृत या दोन्ही भाषांमध्ये साम्य असल्यामुळेच जर्मनीत संस्कृतवरील संशोधनाचे काम जास्त झाले आहे, हा समज खरा आहे का? 

- या दोन्ही भाषा पूर्ण वेगळ्या आहेत; पण त्यात अगदीच काही साम्य नाही असेही नाही. उदाहरणार्थ, आपल्याकडे भावाला संस्कृतमध्ये भ्राता म्हणतो, तर जर्मन भाषेत ब्रुडर म्हणतात. बहिणीला स्वसर म्हणजे सिस्टर म्हणतात. संस्कृतप्रमाणे जर्मनही एकाच इंडो-युरोपीयन कुलातील आहे. त्यामुळेच या दोन्ही भाषांमधील साम्यही पुष्कळ आहे. तसेच एक गोष्ट खरी आहे, ती ही, की इंग्लिश भाषेपेक्षा जर्मन भाषेत जर्मनीमध्ये पहिल्यापासूनच संस्कृतमध्ये संशोधन खूप जास्त झाले आहे.

- तुम्ही या मध्ययुगीन भाषांवरील स्फुट, पण मौलिक लेखन केले असून, भाषणेही दिली आहेत. तसेच पारशी अवेस्ता ग्रंथावर मराठीतही लिखाण केले आहे. हे सारे कसे करता आले?
- मला सुचत गेलेल्या विषयांवर मी वेळोवेळी विस्ताराने लेख लिहित गेलो. तसेच अनेक भाषणेही दिली. याचे मोल ज्यांना समजले, त्यात नंदा नारळकर हे इंजिनीअर गृहस्थ होते. त्यांनी यावर एकत्र पुस्तक काढण्याची तयारी दर्शवली; पण हे सारे कोण वाचणार असा प्रश्नए मला पडल्याने मीही त्यांचे म्हणणे तेव्हा फारसे गांभीर्याने घेतले नाही. पुढे त्यांना कॅन्सर झाला आणि मृत्युसमयी त्यांनी वाईतील संस्कृत प्रज्ञा पाठशाळेचे मे. पु. रेगे यांच्याकडून ते प्रसिद्ध करण्याचे वचन घेतले. पुढे नारळकरांच्या इच्छेनुसार ते प्रज्ञा पाठशाळेतर्फे प्रसिद्धही झाले! नारळकरांच्या मनाचा तो मोठेपणाच आहे. त्यात माझे विविध विषयांवरील निवडक असे एकंदर ६० लेख प्रसिद्ध झाले आहेत! प्राचीन भारतीय साहित्य आणि संस्कृती असे त्या लेखांचे स्थूलमानाने विषय आहेत. त्याशिवाय भाषिक अंगाने अवेस्तावर एक संपूर्ण मराठीत पुस्तक लिहिले.

- लेखांच्या व भाषणांच्या जोडीला तुमचे ग्रंथलेखन व अन्य संशोधनही विपुल झाले आहे...
- हो. मराठीचा भाषिक अभ्यास, वरुणविषयक विचार, प्राचीन भारत, समाज आणि संस्कृती ही माझी काही मराठी पुस्तके; तर इंग्रजीत रिफ्लेक्शन्स ऑफ संस्कृत इन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स, हिस्टॉरिक ग्रामर इन इन्स्क्रिप्शनल प्राकृत आणि वेदा मॅन्युस्क्रिप्ट्स ही इंग्रजी पुस्तकेही मला लिहिता आली. पुढे भांडारकर संस्थेत मला कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत आणि डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स यांसारख्या मोठ्या प्रकल्पांवरही कामे करता आली. त्यापूर्वी डेक्कन कॉलेजात डॉ. मंगेश कत्रे यांच्यामुळे मला संस्कृत भाषेतील महत्त्वाकांक्षी शब्दकोश तयार करण्याच्या कामात सहभाग घेता आला. संस्कृतमध्ये निर्माण झालेला प्रत्येक शब्द कुठून आला, त्याची व्युत्पत्ती, त्या शब्दामागचा इतिहास शोधणे आणि मग त्याचा नेमका अर्थ कोणता हे शोधून काढणे असे ते प्रचंड काम होते. तसेच शीलालेखांसंबंधीची माहिती किंवा त्यावरील कामही मला करता आले. ही शिस्त मला पुढच्या संशोधनातून अधिक काटेकोरपणे बाणवता आली.

- तुमचे हे कार्य खूप मोठे आहे. या पार्श्व भूमीवर तुमचे वैयक्तिक आयुष्य व पुढे कौटुंबिक जीवन याबाबत काय सांगता येईल?
- माझे संस्कृत प्रेम आणि संशोधन हे काम मी माझ्या कुटुंबाच्या आधारामुळेच करू शकलो. माझे वडील बडोदा येथे रेल्वे स्टेशनवर स्टेशनमास्तर होते. मला दोन भाऊ आणि एक बहीण. माझी पत्नी कुसुम ही बडोदा येथील बीएससी आणि पुढे बीटी झालेली. तीही माझ्याबरोबर जर्मनीला आली होती. तिथे ग्रंथालयशास्त्राची पदवी घेतली व पुढे परत आल्यावर तिने डेक्कन कॉलेजात लायब्ररीयन म्हणूनही काम केले. मला माझ्या कामात मिळालेल्या अनेक पुरस्कारांमुळे झालेल्या आनंदात माझे कुटुंबही सहभागी झाले. माझा मोठा मुलगा निवृत्त कर्नल प्रदीप, त्याची पत्नी रोहिणी, तसेच सध्या वर्धा सेवाग्राम येथे असलेले धाकटे चिरंजीव डॉ. अशोक व पत्नी अनुराधा आणि या साऱ्यांची मुलं हा माझा मोठा परिवार आहे. या सगळ्यांमुळेच मला आयुष्याच्या या टप्प्यावर मोठं समाधान मिळत आहे. त्यांच्या या आधारावरच आजही खूप काही करावे असे वाटते; पण शरीर म्हणावी तशी साथ देत नाही.

- सर, तुमचा विवाह अनेकांचा विरोध पत्करून झालेला आहे. हे खरे आहे का? 
- होय. आमच्या विवाहाला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. माझी पत्नी कुसुम हिने मला मोठी साथ दिली होती. त्यामुळेच आमचे सहजीवन तितकेच आनंदी ठरले. १९४१मध्ये माझा विवाह झाला आणि त्याला अनेकांनी विरोध केला. कारण तो विवाह आंतरजातीय होता. माझी नियोजित पत्नी कुसुम सीकेपी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. आम्ही शाकाहारी, तर ते पूर्ण मांसाहारी. हे सारे आग्रहाने करण्याचे कारण म्हणजे त्या काळात आंतरजातीय विवाह करण्याची मी आणि माझे चार मित्र काटे, ढवळे, टोळे आणि धुपकर यांनी शपथ घेतली होती! माझ्या बहिणीने माझ्या निर्णयास तर स्पष्ट शब्दांत नकार दिला; पण मी माझ्या नियोजित पत्नीला नाराज केले नाही. या लग्नाला मोठे कुणी उपस्थित राहाण्याची शक्यता नसल्याने माझ्या लग्नाची कुंकुमपत्रिका मीच तयार केली! ती अशी - ‘मी आणि कुसुम परळीकर विवाहबद्ध होत आहोत. तरी आपण येऊन आम्हाला शुभाशीर्वाद देऊन उपकृत करावे!’ तर अशी ही सारी गंमत आहे!

(डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांना ९८ वर्षे झाल्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या एका डॉक्युमेंट्रीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)



(मुलाखत पूर्वप्रसिद्धी : सहा सप्टेंबर २०१७)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZWJBG
Similar Posts
लोकशिक्षक संत तुकाराम जीवनातील सर्व चढउतारांमध्ये संत तुकारामांमधील माणूसपण टिकून राहिले आहे. सर्वसामान्य माणसासारखे राहून, माणूसपणा कायम ठेवून माणुसकीच्या शिडीवरून देवत्वाला पोहोचलेला हा संत आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना ते आपलेसे वाटतात. त्यांनी लोकशिक्षकाची मोठी भूमिका निभावली. आज तुकाराम बीज आहे. या दिवशी संत तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते
पु. ल. देशपांडे जगभर पसरलेल्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मनापासून अतोनात प्रेम केलं, अशा महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणजेच ‘पुलं’चा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
‘पर्फेक्शनिस्ट’ रांगणेकर ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर यांचा एक फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचे भाचे मुरलीधर गावस्कर यांनी जाग्या केलेल्या त्यांच्या स्मृती, तसेच, रांगणेकरांविषयी आणखी काही माहिती देणारा हा लेख...
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language